लोकतीर्थ

'लोकतीर्थ' म्हणजेच स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांचा जीवनपट -

उभारण्यामागचा हेतू
काँग्रेसचे नेते, भारती विद्यापीठाचे संस्थापक-कुलपती, दिवंगत स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आणि लोकतीर्थ स्मारकाचे लोकार्पण ५ सप्टेंबर २०२४ रोजी काँग्रेसचे नेते खा.राहुल गांधी यांच्या हस्ते झाले. हे स्मारक भव्य आणि दिव्य स्वरूपात उभारण्यात आले असून आ. डॉ. विश्वजित कदम साहेबांच्या संकल्पनेतून एका झुंजार नेतृत्वाच्या जीवनप्रवासावर याद्वारे प्रकाश टाकण्यात आला आहे. स्मारक पाहून स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांच्या कार्याची उंची लक्षात येते. त्यांचा संपूर्ण जीवनपटच डोळ्यांसमोर उभा राहतो.

आयुष्यभर जनतेसाठी झटणारे स्व. डॉ. पतंगराव कदम साहेब स्मारक रूपाने सर्वांना समजावेत यासाठी स्मारकास ‘लोकतीर्थ’ असं नाव देण्यात आलं आहे. स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांचे स्मारक अधिकाधिक लोकोपयोगी आणि अभिजात करण्याच्या दृष्टीने त्यांचे पुत्र आ. डॉ. विश्वजित कदम साहेब व त्यांच्या कुटुंबीयांनी स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांच्या कार्याला लोकांसमोर वेगळ्या रुपात मांडले आहे.

.... असा आहे परिसर :

स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांनी स्थापन केलेला आणि उत्तम चाललेला वांगी येथील सोनहिरा सहकारी साखर कारखाना परिसरातील सुमारे दहा एकर जागेवर ‘लोकतीर्थ’ दिमाखदार उभारले आहे. स्मारकाच्या प्रवेशद्वारात स्वागत कक्ष, स्वागत कमान आहे. स्मारक परिसरात स्वच्छ व सुंदर रस्ते, वॉकिंग ट्रॅक, रस्त्यालगत फूलझाडी दिसते. समोरच आकर्षक विठ्ठल-रुक्मिणी, तुळजाभवानी व श्री गणेश मंदिर आहे. तीनही मंदिरांवर कोरीव नक्षीकाम लक्षवेधी आहे.

स्वागत कमानीतून पुढे उजवीकडे डॉ. पतंगराव कदम यांचे स्मारक व पूर्णाकृती पुतळा आहे. स्मारक स्थळाकडे जाताना दुतर्फा वाहते पाणी, कारंजे, फूलझाडी, विस्तीर्ण हिरवाई उभारली आहे. स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांचा १८ फूट उंचीचा उभारण्यात आलेला पूर्णाकृती पुतळा दिल्लीतील नामांकित शिल्पकार राम सुतार यांच्या कुंचल्यातून साकारला गेला आहे.

वस्तुसंग्रहालय :

स्मारक स्थळाच्या बाजूने वस्तुसंग्रहालयाकडे जाण्याचा मार्ग आहे. सर्वांना स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांचा संपूर्ण जीवनपट येथे पाहायला मिळतो. गवताची हिरवळ, सजावट पाहून मनाला वेगळीच प्रसन्नता मिळते. आग्नेय दिशेला सोनहिरा कारखाना, पश्चिमेला डोंगर रांगा, स्मारकाच्या मागील बाजूस नैसर्गिक तलाव असे मनमोहक दृश्य येथे आहे. स्मारकस्थळाच्या पूर्वेस आकर्षक व भव्य सभागृह साकारले आहे. स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांनी राजकीय कारकिर्दीच्या सुरवातीला (सन १९८४) साली वापरलेली मोटार येथे ठेवली आहे.

विकासपुरुषास अभिवादन करण्यास
"लोकतीर्थ" स्मारकस्थळी मान्यवरांची मांदियाळी !

'लोकतीर्थ'कडे जाण्याचा मार्ग...

Scroll to Top