
उत्कृष्टतेची बांधिलकी आणि सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी समर्पण केलेल्या प्रेरणादायी नेत्याचा स्मृती सोहळा
स्व. डॉ. पतंगराव कदम साहेब यांनी पाच दशकांहून अधिक काळ शिक्षण, सामाजिक, राजकीय, सहकार, कृषी, सिंचन, आरोग्य, क्रीडा, कला, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान देऊन महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलला. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा कृतिशील वारसा त्यांनी पुढे चालविला, जो आपल्या सर्वांसाठी अविरत ऊर्जा देणारा आहे. अखंड कार्यमग्नता आणि प्रचंड सकारात्मकता हा डॉ. पतंगराव कदम साहेबांचा गुणविशेष आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य काँग्रेस पक्षासाठी वेचले. त्यांनी आयुष्यभर जनकल्याणासाठी स्वत:ला वाहून घेतले होते. सर्वसामान्य माणसांत देव पाहून त्यांनी निरलस भावनेने जनसेवा केली. पलूस, कडेगाव हा भाग एकेकाळी दुष्काळी भाग होता. त्या दुष्काळी भागात शेतकऱ्यांचा संसार फुलवायचा असेल तर पाण्याची आवश्यकता होती. हे लक्षात घेऊन स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांनी टाकळीचे धरण, टेंभू, ताकारी योजना व इतर सिंचन योजना मार्गी लावून या दुष्काळी तालुक्यांत पाणी आणून या परिसराचे नंदनवन केले. दुष्काळ कायमचा हटवण्यासाठी त्यांनी जिद्दीने काम केले आणि पिण्याचे पाणी व सिंचनाच्या सुविधा या भागात उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणली. डॉ. पतंगराव कदम साहेबांचे असणे हीच एक प्रचंड ऊर्जा होती. त्यांनी केवळ संस्थाच उभ्या केल्या नाहीत तर प्रचंड मेहनत करून त्या नावारूपाला आणल्या. त्यांनी अनेक माणसे घडवली. कार्यकर्ते घडवले. त्यांच्या मनात सकारात्मक कार्याचे बीज पेरले. प्रोत्साहन दिले. प्रत्येक कार्यकर्त्याला कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी दिली. त्यांचे ‘लोकतीर्थ’ स्मारक पुढील पिढीला नक्कीच दिशादर्शक व प्रेरणादायी ठरेल.